

चिपळूण : शहरातील संसारे नाका परिसरात आज सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका हायस्कूलची 10 वर्षीय विद्यार्थिनी थोडक्यात बचावली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संसारे नाका येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या एका महिलेने सुमारे 20-25 कुत्रे पाळली आहेत. हे कुत्रे येणाऱ्या-जाणाऱ्या महिला आणि विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून जातात. आज सकाळी ही विद्यार्थिनी शाळेत जात असताना या कुत्र्यांनी तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. सुदैवाने, जवळच असलेल्या 4-5 नागरिकांनी प्रसंगावधान राखून धाव घेतल्यामुळे मुलीचे प्राण वाचले. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक त्रस्त असून, नगर पालिका, पोलिस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या बेकायदेशीर वास्तव्याकडे लक्ष देऊन कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणाची चिपळूण नगर पालिकेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनीही गंभीर दखल घेतली असून, त्या संदर्भात उपाय योजना करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली आहे.