बेळगाव : महापालिकेच्या चारही स्थायी समित्यांची मुदत जूनअखेर संपणार असल्यामुळे प्रादेशिक आयुक्तांनी 2 जुलै रोजी निवडणूक घेण्याचे जाहीर केले आहे. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
महापालिकेत अर्थ व कर स्थायी समिती, बांधकाम स्थायी समिती, आरोग्य स्थायी समिती आणि लेखा स्थायी समित्या आहेत. या समित्यांवर सत्ताधारी भाजपचे वर्चस्व आहे. प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टेण्णावर यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 2 जुलै रोजी महापालिका सभागृहात निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. चारही स्थायी समितींसाठी सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
त्यानंतर दुपारी 3 वाजता स्थायी समिती सदस्य निवडीसाठी सभा होणार आहे. या काळात उमेदवारी मागे घेणे, निवड बिनविरोध जाहीर करणे, आवश्यकता भासल्यास मतदान घेणे आणि त्यानंतर निकाल जाहीर करणे, अशी प्रक्रिया चालणार आहे.
निवडणुकीसाठी महापालिकेच्या कौन्सिल विभागाकडून तयारी करण्यात येत आहे. महापालिकेत भाजपचेच वर्चस्व असल्यामुळे स्थायी समितीतही त्यांचीच बाजी असणार आहे.
महापालिकेत आतापर्यंत स्थायी समितीमध्ये सत्ताधारी 4 आणि विरोधी तीन असा फॉर्म्युला राहिला आहे. पण, महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांच्यावर अपात्रतेच्या प्रकरणावरुन सत्ताधारी गट विरोधी गटाला यावेळी स्थायी समितीत जागा देणार की नाही, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.