

निपाणी : येथील जत्राटवेसमधील जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणासाठी अनेक वर्षांपासून दलित समाजासाठी राखीव ठेवली आहे. असे असताना या जागेवर सरकारी महाविद्यालय आणि शासकीय यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा मैदानाचा प्रश्न नसून दलित समाजाच्या अस्तित्वावर आक्रमण आहे. ही जागा इतर कामांसाठी वापरली गेल्यास दलित समाजाकडून न्यायालयीन लढा दिला जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते जीवन घस्ते यांनी दिला.
याबाबत बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या नेतृत्वाखाली निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, नगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली.
घस्ते म्हणाले, नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र.1231 नुसार या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण निर्मितीचा निर्णय घेण्यात आला होता. त्या वेळेपासून ही जागा दलित समाजासाठी राखीव आहे. यापूर्वीही समाजाला अंधारात ठेवून हीच जागा दोन संस्थांना देण्याचा प्रस्ताव आला होता. पण समाजाच्या विरोधामुळे तो मागे घेण्यात आला.
सध्या ही जागा विद्यापीठ किंवा इतर प्रकल्पासाठी हस्तांतरण करण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे. हा निर्णय केवळ पूर्वीच्या ठरावाच्या विरोधातच नाही तर स्थानिक दलित समाजाच्या भावना व अस्तित्वाच्या विरोधात आहे. शाळा, महाविद्यालयाला आपला विरोध नाही. शहरात परिसरात अनेक जागा आहेत. असे असताना दलित समाजाची जागा का? समाजाच्या विरोधात जाऊन अंमलबजावणी झाल्यास न्यायालयीन लढाई लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीस नगरसेवक रवींद्र श्रीखंडे, लोकेश घस्ते, महेंद्र सूर्यवंशी किसन दावणे, प्रवीण हेगडे, सर्जेराव हेगडे, शेखर सोनटक्के, प्रकाश कांबळे, अक्षद पवन, विश्वनाथ कांबळे, अरविंद वाळके, शशिकांत कांबळे, नामदेव कांबळे, कांबळे, चंद्रकांत खातेदार, रवी घस्ते, ऋषिकेश कांबळे, किसन सावंत, अविनाश भोसले आदी उपस्थित होते.