

बेळगाव: स्क्रॅप गोदामाला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 5) शेट्टी गल्लीत घडली. या आगीत गोदामातील चार दुचाकीही जळून खाक झाल्या. या घटनेमुळे या परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशीरापर्यंत घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली नव्हती. त्यामुळे, नुकसानीची निश्चित आकडा समजू शकला नाही.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, शेट्टी गल्लीत असलेल्या या स्क्रॅपच्या गोदामाला दुपारी अचानक आग लागली. गोदामात काही फ्रीज होते. त्यांची वायर शॉर्टसर्किट होऊन जवळच्या वस्तूंनी पेट घेतला. त्याला लागूनच स्पंज होता. त्यामुळे आगीचा जोरदार भडका उडाला. बघताबघता आग आजूबाजूला पसरली. या आगीमुळे पार्क करण्यात आलेल्या दुचाकींनीही पेट घेतला. त्यामुळे, धूर व आगीचे लोळ उठले.
स्थानिक रहिवासी व कामगारांनी प्रसंगावधान राखून आग आटोक्यात आणून विझवली. मात्र, या घटनेत चारही नादुरुस्त दुचाकी वाहने व गोदामातील बरेचसे साहित्य आगीत भस्मसात झाले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात नव्हती. त्यामुळे, नुकसानीचा आकडा समजला नाही.