

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा: वृद्ध माता पित्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करुन तेथून काढता पाय घेण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. असाच एक प्रकार दि. २२ मार्चरोजी घडला. वडिलांना भाजलेल्या अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करून मुलगा पसार झाला. दरम्यान, वडिलाचा उपचारदरम्यान सोमवारी (दि. ३१) मृत्यू झाला. ही बातमी समजताच मुलाने जबाबदारी झटकून पळ काढला. मात्र, गोवा येथे राहत असलेल्या मुलीला ही माहिती मिळताच तिने बेळगावात येऊन आज (दि.१) वडिलांवर अंत्यसंस्कार केले. (Belgaum News)
सिद्धेश्वर सिन्हा (वय ६२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती शहरातील एका हॉटेलमध्ये काम करत होती. या व्यक्तीचा मुलगा उत्तम सिन्हा (वय २२) याने दि.२२ मार्चरोजी वडिलांना उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर तो रुग्णालयात फिरकला नाही. उपचार दरम्यान सोमवारी त्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर मुलाला संपर्क साधला असता त्याचा फोन बंद असल्याचे आढळून आले. त्या मृत व्यक्तीची मुलगी निधी गोवा येथे राहत असल्याची माहिती मिळाली. तिच्याशी संपर्क साधला असता तिने जिल्हा रुग्णालयात धाव घेत वडिलांचा मृतदेह ताब्यात घेतला. सदाशिवनगरातील स्मशानभूमीत आज वडिलांच्या मृतदेहाला भडाग्नी देत अंत्यसंस्कार पार पाडले. या काळात मुलगा उत्तम सिन्हा फिरकला नाही.