

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील काही गावांत रेशनच्या तांदळाचे वितरण झाले नव्हते. तर काही गावात कमी तांदळाचे वितरण करण्यात आले होते. याबाबत दै. पुढारीने ‘ग्रामीण भागातील तांदूळ वितरण विस्कळीत’ या मथळ्याखाली गुरुवारी (दि. 27) वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा खात्याला जाग आली. अद्याप रेशन वितरण न झालेल्या गावांत तातडीने रेशन वितरणास सुरवात झाली.
ग्रामीण भागातील काही सरकारमान्य रेशनदुकानदार नेहमीच रेशन वितरण करताना काटामारी करतात, अशा तक्रारी आहेत. फेब्रुवारी व मार्च महिन्यातील मिळून माणसी 15 किलो तांदूळ वितरणाचा आदेश असूनही तांदळाचा पुरवठा कमी आहे. तांदूळ आम्हाला अजून मिळालेच नाही अशी सबब सांगून काही गावांतील ग्राहकांना तांदूळ वितरण केले जात नव्हते. या प्रकरणात ग्रामीण भागात तांदूळ वितरण करणारा एक अधिकारीच सामील असल्याचे आरोप होत होते. याबाबतचे वृत्त दै. पुढारीतून प्रसिद्ध होताच अन्न व नागरी पुरवठा खात्याचे उपसंचालक मल्लिकार्जुन नायक यांनी ग्रामीण भागात तांदूळ वितरण न झालेल्या गावाची यादी मागवली. तेथील रेशन दुकानदारांना कानपिचक्या दिल्यानंतर शुक्रवारपासून (दि. 28) तांदळाचे वितरण करण्यास सुरुवात झाली.