

निपाणी : शहराबाहेरील निपाणी-अकोळ मार्गावरील हुडको कॉलनीमध्ये भुयारी गटार तुंबल्याने शौचालयाचे पाणी थेट नागरिकांच्या घरामध्ये शिरत आहे. याबाबत संबंधित प्रभागाच्या माजी नगरसेविका अनिता पठाडे आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीप पठाडे यांनी पालिका आयुक्तासह आरोग्य विभागाला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे. दुर्गंधीयुक्त पाणी सखल भागात असलेल्या अनेक घरांमध्ये जात असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
काही वर्षांपूर्वी भुयारी गटाराची निर्मिती केली आहे. सुरुवातीच्या काळात शौचालय व इतर सांडपाणी थेट ओढ्याला जात होते. त्यानंतर भुयारी गटारीची नगरपालिका प्रशासनातर्फे स्वच्छता केली जात नसल्याने वारंवार तुंबत असल्याने पावसाळ्यातही सांडपाणी परिसरातील आठ ते दहा कुटुंबीयांच्या घरात शिरत आहे. या समस्येमुळे परिसरातील काही नागरिक घरांची विक्री करून इतरत्र वास्तव्यास गेले आहेत. हुडको कॉलनी परिसरात नगरपालिकेतील काही कर्मचारी वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरातही हीच समस्या कायम आहे. तरीही पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत पालिका आयुक्तासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याकडे तक्रार केली असता कर्मचारी, मशिनरी नसल्याचे नसल्याचे जुजबी कारण सांगितले जात आहे. त्यामुळे केवळ आश्वासनेच मिळत असल्यास भविष्यात या प्रभागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे.
कायमस्वरूपी तोडगा काढावा
दरम्यान, मंगळवारी पालिकेकडून या भागातील शौचालयाच्या पाण्याचा निचरा तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आला असला, तरी त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक दिलीप पठाडे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.