

बेळगाव ः बेळगावातील अधिवेशनात पहिल्यांदाच दुसऱ्या दिवशी उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर चर्चा सुरू झाली. पण अर्ध्या तासाच्या या चर्चेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार चकमक झाली. त्यामध्ये विरोधी गटावर मंत्री कृष्ण ब्यायरेगौडा आणि प्रियांक खर्गे भारी पडले. अखेर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दोन्ही बाजूने सबुरीने चर्चा करावी, असा सल्ला दिला.
सुवर्णसौधमध्ये मंगळवारी (दि. 9) दुपारी 3 वाजता उत्तर कर्नाटकावर चर्चेला सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले, दरवर्षी केवळ शेवटचे दोन दिवस उत्तर कर्नाटकावर चर्चा करण्यासाठी देण्यात येतात. त्यातही अनेक विधेयके असतात. यंदा लवकर चर्चा सुरू असल्यामुळे समस्यांचे निकारण होईल, अशी अपेक्षा आहे. गेल्या तीन वर्षांत सरकारने उत्तर कर्नाटकाबाबत केवळ लोकांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे एकदा दुष्काळ, दुसऱ्यांदा अतिवृष्टी आणि आता खुर्चीचे कारण देत सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. या भागात सत्तर टक्के लोक शेतकरी आहेत. सरकार खोटी आकडेवारी देत आहे. निवडणूक जाहीरनाम्यातील सर्व घोषणांना हरताळ फासला आहे. केवळ मोफत आणि गॅरंटी योजना असा पोकळ आव आणण्यात येत आहे.
आरोपांवर मंत्री कृष्ण ब्यायरेगौडा आणि प्रियांक खर्गे तुटून पडले. आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो, त्यानंतर केंद्र सरकारने आमचे पैसे दिले. आतापर्यंतच्या राज्यातील इतिहासातील सर्वात मोठी मदत आम्ही शेतकऱ्यांसाठी केली आहे, असे दोन्ही नेत्यांनी सांगितले. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ झाला. दोन्ही बाजूंनी आरोप, प्रत्यारोप करण्यात आले. त्यामुळे अखेर अध्यक्ष यू. टी. कादर यांनी सभागृह पंधरा मिनिटांसाठी तहकूब केले.
सभागृह सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मनोगत व्यक्त केले. आरोप करणे हा विरोधी पक्षाचा हक्क आहे. पण तो चुकीचा असू नये. कोणीही बोलताना अडवू नये, असे सांगत दोन्ही बाजूंनी सबुरीने काम करावे, असे ते म्हणाले. सध्या आपल्या कामकाजाबाबत लोकांत फारसे चांगले मत नाही. त्यामुळे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी चर्चा करावी, असे सांगितले. अखेर उत्तर कर्नाटकाची चर्चा बुधवारी (दि. 10) सुरू ठेवण्याचा निर्णय झाला.