Belgaum Accident: रक्षाबंधनादिवशीच तुटला बहीण-भावाच्या नात्याचा धागा

बेळवट्टीहून माहेरी सुळग्याला जाताना अपघात : म्हैस आडवी आल्याचे निमित्त
 Accident News
Accident NewsPudhari
Published on
Updated on

बेळगाव : रक्षाबंधनसाठी भावाच्या दुचाकीवरून माहेरी जात असलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. रेखा महेश हारुगडे (वय ३५, सासर बेळवट्टी, माहेर सुळगा-हिंडलगा) असे मृत महिलेचे नाव आहे.

शुक्रवारी रक्षाबंधन असल्याने या दिवशी सकाळी रेखा यांचा भाऊ त्यांना आणण्यासाठी सासरी बेळवट्टीला गेला. त्यांना घेऊन दुपारी अडीचच्या सुमारास ते बेळवट्टीहून सुळगा हिंडलग्याला परतत होते. यावेळी भावाच्या दुचाकीच्या आडवी म्हैस आल्याने भावाने अचानक ब्रेक दाबला. यामुळे रेखा या तोल जाऊन रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना केएलई रूग्णालयात दाखल केले.

प्रकृती अधिकच चिंताजनक बनल्याने त्यांना हुबळी येथील किम्‍स रूग्णालयात हलविण्यात आले. परंतु, उपचाराचा उपयोग न होता शनिवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. ही घटना काकती पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यामुळे पोलिसांनी याची नोंद करून घेतली असून निरीक्षक सुरेश शिंगे तपास करीत आहेत.

राखीऐवजी मृतदेह उचलण्याची वेळ

बहिणीकडून राखी बांधून घ्यायची, तिच्या हातचे काहीतरी गोडधोड खायचे, तिलाही राखीच्या बदल्यात साडी द्यायची आणि पुन्हा तिला सासरी नेऊन सोडायचे, अशी स्वप्ने पाहत भाऊ तिला दुचाकीवरून घेऊन जात होता. परंतु, म्हैस आडवी आल्याचे निमित्त झाले अन् बहिणीचा दुर्दैवी अंत झाला. ज्या मनगटावर बहीण राखी बांधणार होती त्याच हाताने तिचा मृतदेह उचलण्याची वेळ आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news