

बेळगाव : कपिलेश्वर रोड येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. 24) सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. सिद्धांत रामा पुजारी (वय 27, रा. कपिलेश्वर रोड) असे मृताचे नाव आहे. मृत्यूपूर्वी त्याने मोबाईलमध्ये एक संदेश टाईप केला असून देवाने आपल्याला न्याय दिला नसल्याने जीवन संपवत असल्याचे त्यात म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येव्यतिरिक्त संशयास्पद मृत्यू अशी नोंद करून घेतली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः सिद्धांत हा ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होता. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास तो आपल्या खोलीत गेला. यावेळी त्याने खोलीतील पंख्याला कापड बांधून त्याद्वारे गळफास घेतला. शिवाय त्याने आत्महत्येवेळी टॉवेल आपल्या हातांना गुंडाळल्याचे आढळून आले. बुधवारी सकाळी तो उठला नसल्याने त्याचे वडील उठवण्यासाठी गेले.
दरवाजा आतून बंद असल्याने त्यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून पाहिले असता आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी त्याचे वडील रामा गोपाळ पुजारी यांनी खडेबाजार पोलिसांत फिर्याद दिली आहे. दरम्यान, खडेबाजार पोलिसांनी संशयास्पद मृत्यू अशी नोंद करुन घेतली असून पुढील तपास करत असल्याचे निरीक्षक गाबी यांनी सांगितले.
आत्महत्येपूर्वी सिद्धांतने चिठ्ठी लिहिल्याचे समजल्याने याची विचारणा करण्यासाठी खडेबाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीशैल गाबी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ही स्वतंत्र चिठ्ठी नसून त्याने मोबाईलवर संदेश टाईप केला आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी आपल्या वडिलांकडे कपिलेश्वर मंदिराचे पुजारी म्हणून काम होते. पूजेचा मान गेल्यानंतर आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही बरेच धडपडलो. प्रकरण पोलीस ठाण्यात गेले; पण देवाने आमच्यावर अन्याय केला आहे. माझ्या मृत्यूनंतर तरी देव आपल्याला न्याय देईल, अशी आशा आहे, तरीही थँक्यू मम्मी-पप्पा, थँक्यू फ्रेन्डस् असा उल्लेख या चिठ्ठीमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.