

बेळगाव : जय किसान खासगी होलसेल भाजी मार्केटवर अन्याय झाला आहे. त्यामुळे मार्केट पुन्हा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करत मंगळवारी (दि. 23) व्यापारी आणि शेतकर्यांनी चन्नम्मा चौकात ठिय्या मारत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी अखेर वाद न्यायालयात असल्यामुळे घाऊक व्यापार करता येणार नाही; पण किरकोळ खरेदी-विक्री करण्यास परवानगी देण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
व्यापारी आणि शेतकर्यांनी सकाळी गांधीनगरमधून चन्नम्मा चौकापर्यंत मोर्चा काढला. मोर्चात बेळगाव, खानापूरसह सौंदत्ती, कित्तूर, बैंलहोंगल भागातून शेतकरी सहभागी झाले होते. त्यात महिलांची संख्याही लक्षणीय होती. शेतकरी बैलगाडीसह मोर्चात सहभागी झाले होेते. मोर्चा चन्नम्मा चौकात आल्यानंतर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे संपूर्ण रहदारी ठप्प झाली होती. मोर्चाची दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आंदोलकांना भेटले. त्यांनी जय किसान भाजी मार्केटमध्ये तात्पुरत्या स्वरूपात किरकोळ खरेदी-विक्री सुरू करण्याची परवानगी दिली जाईल. होलसेल विक्री व्यवहार करता येणार नाही. सदर प्रकरण उच्च न्यायालयात असून, याबाबत सुनावणी होणार आहे. न्यायालयाचा आदेश सर्वांनाच बंधनकारक असणार आहे, असे सांगितले.
यावेळी आमदार अभय पाटील म्हणाले, जिल्ह्यात दोन भाजी मार्केटची गरज आहे. शेतकर्यांना कोणत्याही भाजी मार्केटमध्ये शेतीमाल घेऊन जाता आला पाहिजे. खासगी व्यापार्यांनी दुकान गाळे उभारले आहेत. त्यामुळे अचानकपणे व्यवसाय बंद करा, अशी बळजबरी करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. खासदार इराण्णा कडाडी, माजी आमदार संजय पाटील यांनीही विचार मांडले.
बेळगाव जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे. या ठिकाणी दोन भाजी मार्केट असतील, तर शेतकर्यांनाच फायदा होणार आहे. जय किसानचे व्यापारी व शेतकरी यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध आहेत. भाजी मार्केटचे बांधकामही नियमानुसार झाले आहे. तरीही भाजी मार्केटवर कारवाई करण्याचे कारण काय, असा संतप्त सवाल शेतकरी आणि व्यापार्यांनी केला. मोर्चावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस आयुक्त भूषण बोरसे, डीसीपी नारायण बरमनी, व्यापारी संघटनेचे दिवाकर पाटील, सुनील भोसले, विश्वनाथ पाटील, मोहन मन्नोळकर आदी यावेळी उपस्थित होते.
चौकात लागली पंगत
मोर्चात सहभागी झालेल्या व्यापारी आणि शेतकर्यांनी दुपारी चौकातच पंगत मांडून जेवण केले. या चौकात पहिल्यांदाच पंगत लावण्यात आल्यामुळे हा विषय चर्चेचा बनला होता.