

बेळगाव : शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात तब्बल 15 ते 16 तास लागत आहेत. यामुळे मृताच्या नातेवाईकांना शवविच्छेदन विभागासमोर ताटकळत थांबावे लागल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. विषप्राशन केलेल्या एका व्यक्तीचा शुक्रवार दि. 26 रोजी रात्री मृत्यू झाला. त्या व्यक्तिच्या मृतदेहाचे सकाळी शवविच्छेदन करू, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, सकाळी डॉक्टर आलेच नाहीत. सकाळी 11 पर्यंत नातेवाईकांनी वाट पाहिली. त्यानंतर नातेवाईकांनी याची माहिती वरिष्ठ डॉक्टरांना दिली. मात्र, बिम्स रुग्णालयाच्या अधीक्षकांनी हात झटकले. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करताच तातडीने डॉक्टर त्या ठिकाणी हजर झाले. या प्रकारामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाचा सावळागोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. शवविच्छेदनासाठी मृताच्या नातेवाईकांना दीड ते दोन दिवस ताटकळत थांबावे लागत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकारावरून बिम्स रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचार्यांवर वरिष्ठ अधिकार्यांचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.
विषप्राशन, अपघात, सर्पदंश, आत्महत्या, आकस्मिक मृत्यू झाला तर? ? ? मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले जाते. अलीकडे हृदयविकाराने मृत्यू झाला तरी शवविच्छेदन करण्यात येत आहे. रोज सरासरी 7 ते 8 मृतदेहांचे शवविच्छेदन केले जात आहे. काहीवेळा तर 10 ते 15 मृतदेहांचे शवविच्छेदन करावे लागत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी समस्या निर्माण होत आहे. तेव्हा अधिक कर्मचारी तसेच डॉक्टरांची नियुक्ती करण्याची गरज आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
मी सुट्टीवर आहे, वरिष्ठांना फोन करा
शुक्रवारी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक रात्रभर रुग्णालयात ताटकळत थांबले होते. शनिवारी सकाळीही डॉक्टर आले नाहीत. याबाबत बिम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इरण्णा पल्लेद यांच्याशी संपर्क साधला असता मी सुट्टीवर आहे. वरिष्ठांना फोन करा, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे एकप्रकारे जबाबदारी झटकण्याचा हा प्रकार असून याकडे आता प्रादेशिक आयुक्तांनीच गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.