

कुर्ली : आप्पाचीवाडी येथील कॅनॉलवर पूल निर्मितीसाठी अनेकदा मागणी, वेळोवेळी निवेदने देऊनही आजतागायत दुर्लक्ष झाले आहे. यापूर्वी एकदा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत नारळ फोडून उद्घाटनही करण्यात आले. कॅनॉलवर पूल मंजूर असल्याचे नागरिक अनेक वर्षापासून ऐकत आहेत. पण अद्याप पुलाची निर्मिती झालेली नाही. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
आप्पाचीवाडीसह परिसरातील चार गावांतील नागरिक कॅनॉलवर पूल मंजूर असल्याचे आजतागायत केवळ ऐकत आले आहेत. पण पूल मंजूर होऊनही अद्याप का निर्माण केले नाही, याचे स्पष्टीकरण संबंधित विभागाकडून दिले जात नाही. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे चिरंजीव आ. यतिंद्र सिद्धरामय्या यांनाही परिसरातील शेतकऱ्यांतर्फे सदर पूल निर्मितीसाठी निवेदन देण्यात आले आहे.
आप्पाचीवाडी ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील चार गावांना जोडण्यासाठी या ठिकाणी पूल आवश्यक आहे. कॅनॉलवर पूल निर्मितीची मागणी शेतकऱ्यांतून वारंवार होत आहे. सदर पूल निर्मितीच्या कामाची फाईल कुठे धुळखात पडली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आप्पाचीवाडी गावासाठी वेगवेगळ्या कारणासाठी निधी देण्यात आला आहे. पण कॅनॉलवर पूल निर्मितीबाबत कोणतेही ठोस कार्यवाही अद्याप दिसून येत नाही.
परिसरातील शेतकरी आणि नागरिकांची मागणी लक्षात घेऊन कॅनॉलवर पूल निर्मितीचे काम हाती न घेतल्यास आप्पाचीवाडीतील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तत्काळ कॅनॉलवर पूल निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.