बेळगाव ः रयत गल्ली, वडगाव येथे मोकाट कुत्र्यांनी दहा वर्षांच्या मुलीवर हल्ला करून जखमी केले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. निविका जितेंद्रसिंह राठोड असे जखमी मुलीचे नाव आहे.
वडगाव परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. ही कुत्री महिला आणि लहान मुलांवर हल्ला करत आहेत, तर घराबाहेर थांबवलेल्या वाहनांचेही नुकसान करत आहेत. दिवस-रात्र कुत्र्यांचा उपद्रव होत आहे.रयत गल्लीत सोमवारी (दि. 12) मोकाट कुत्र्यांनी घरासमोर थांबलेल्या निविकावर अचानक हल्ला केला. तिच्या हाताचा आणि पोटाचा चावा घेतला. या घटनेमुळे मुलगी जखमी झाली असून परिसरात दहशत निर्माण झाली आहे. जखमी निविकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. हा प्रकार घडल्याने गल्लीतील लोक घाबरले आहेत. महापालिकेने या मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या वाढत आहे. काही दिवसांपूर्वी आझाद नगर येथे मुलावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून गंभीररीत्या जखमी केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दुसऱ्याच दिवशी बैठक घेऊन कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी फिडींग झोन तयार करण्यात यावेत, अशी सूचना महापालिकेला केली. महापालिकेने जागा निश्चितीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पण, शहरातील कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून लोक दहशतीखाली वावरत आहेत.