

निपाणी : ट्रकमधून गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील युवकाला निपाणी शहर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 3 लाख रुपये किमतीचा 5.50 किलो गांजा मंगळवारी जप्त केला. ही कारवाई महामार्गावर करण्यात आली. दीपक रावसाहेब नाईक (वय 22, रा. सोलापूर, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) असे संशयित युवकाचे नाव आहे. 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला करण्यात आलेल्या या कारवाईमुळे थर्टी फर्स्टच्या रात्री गांजा पुरवठ्याचा इरादा होता, असे स्पष्ट होते.
कोल्हापूरहून संकेश्वरकडे ट्रकमधून एक युवक पोत्यातून गांजा विक्रीसाठी नेत असल्याची माहिती खबऱ्याकडून शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार महामार्गावर सीपीआय बी. एस. तळवार, शहरचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांच्या पथकाने सापळा रचला. संशयित दीपक नाईक हा एका ट्रकमधून पिशवीतून गांजा घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपण हा गांजा कोल्हापूर परिसरातून खरेदी करून तो विक्रीसाठी जात असल्याची कबुली दिली.
दीपकचे गांजा तस्करी करणारे दोघे मित्र इसाक मदरखान व बसवराज बजंत्री (रा. सोलापूर ता. हुक्केरी) यांना 9 डिसेंबररोजी अटक करून त्यांच्याकडून 5.50 लाखाचा 11 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. त्यावेळी या दोघांनी आपल्या टोळीचा गांजा तस्करीचा धंदा असल्याची कबुली दिली होती. तसेच टोळीचा म्होरक्या फरार असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार निपाणी पोलिसांनी 22 दिवसापासून महामार्गावर गस्त सुरू ठेवली होती. अखेर मंगळवारी दीपक नाईक हा पोलिसांच्या हाती सापडला. दीपकवर अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल करून सायंकाळी निपाणी न्यायालयासमोर हजर केले असता त्याची निपाणी न्यायालयाने त्याची बेळगावच्या हिंडलगा जेलमध्ये रवानगी केल्याची माहिती तळवार यांनी दिली.