

ईश्वरपूर : किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथील गणेश खिंड परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तेजस संतोष जगताप (वय 18, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) या संशयिताला ईश्वरपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुरुवारी सायंकाळी अटक केली. त्याच्याकडील 54 हजार रुपये किमतीचा 2 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अक्षय महादेव नलवडे (रा. साखराळे, ता. वाळवा) हा संशयित फरार आहे. संशयित तेजस याला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
गुरुवारी सायंकाळी किल्लेमच्छिंद्रगड येथील गणेश खिंड परिसरात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस दीपक घस्ते यांना मिळाली होती. गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने तेथे सापळा लावून तेजस याला अटक केली. त्याच्याकडे गांजा मिळाला. त्याने हा गांजा साखराळे येथील अक्षय नलवडे याच्याकडून घेतल्याचे सांगितले.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव, पोलिस कर्मचारी कुबेर खोत, शशिकांत शिंदे, विशाल पांगे, दीपक घस्ते, अमोल सावंत, शशिकांत शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.