

बेळगाव ः ऑक़्टोबरपासून सुरू असलेली रेशनकार्ड दुरूस्ती प्रक्रिया पुढील महिनाभर म्हणजेच डिसेंबर अखेरपर्यंत कायम सुरू राहणार आहे. या कालावधीत लाभार्थ्यांना आपल्या रेशनकार्डमधील चुकांची दुरुस्ती व फेरफार करुन घेता येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रेशनकार्ड दुरुस्तीची प्रक्रिया ठप्प झाली होती. रेशनकार्डमधील चुकांमुळे अनेकांना शासकीय कामांपासून वंचित राहावे लागत होते. मात्र, आता रेशनकार्ड दुरुस्ती प्रक्रिया कायम ठेवण्यात आली आहे. संबंधित रेशनकार्डधारकांनी ग्रामवन, बेळगाव वन कार्यालयात जाऊन रेशनकार्डची दुरुस्ती करुन घ्यावी. या प्रक्रियेत नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक किंवा सदस्याची नाव जोडणी करता येणार आहे. यासाठी आधारकार्ड, जात उत्पन्नाचा दाखला अनिवार्य आहे.
राज्य सरकारने पाच हमी योजना सुरु केल्या आहेत. त्यात अन्नभाग्य योजनेचाही समावेश आहे. यांतर्गत माणसी 10 किलो धान्य वितरित केले जात आहे. अंत्योदय आणि बीपीएल कार्डधारकांना याचा लाभ मिळत आहे. मात्र, काहींची रेशनकार्डमध्ये नावे नसल्याने रेशनपासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय शासकीय कामातही अडचणी येत आहेत. मात्र, आता रेशनकार्ड दुरुस्ती प्रक्रिया कायम केल्याने समस्या मार्गी लागणार आहे.
नवीन रेशनकार्ड वितरण प्रक्रियेकडे लक्ष
गत दोन-तीन वर्षापासून नवीन रेशनकार्ड वितरण प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे, दारिद्र्य रेषेखालील गोरगरीब जनतेला अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. गोरगरीब लाभार्थ्यांचे लक्ष नवीन रेशनकार्ड वितरण प्रक्रियेकडे लागले आहे. जिल्ह्यात हजारो लाभार्थ्याची नवीन रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. मात्र, नवीन रेशनकार्ड वितरण प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना रेशनकार्डपासून वंचित रहावे लागले आहे.