

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : येथील गल्फ मैदानावर दोन दिवसीय 'इन्फंट्री गल्फ चषक' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कोल्हापूर, पुणे आणि हुबळी येथून १४० गल्फपटूंनी स्पर्धेत भाग घेतला. अखेरीस, मिहीर अनिल पोतदार यांनी हा प्रतिष्ठित चषक पटकावून २०१८ नंतर पुन्हा यशाची परंपरा पुढे चालवली. (Mihir Potdar Infantry Cup)
स्पर्धेच्या समारोप प्रसंगी जेल विंग कमांडर आणि मेजर जनरल राकेश मनुचा यांनी मिहीर पोतदार यांना इन्फंट्री चषक प्रदान करून गौरवले. यावेळी पीसी विंग कमांडर ब्रिगेडियर के.व्ही.के. प्रकाश, एमएलआरसीचे कमांडर ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्यासमवेत गल्फ प्रेमींची उपस्थित होती.
मिहीर पोतदार यांच्या गल्फ क्षेत्रात यशस्वी मोहिमेमध्ये हा विजय एक नवा टप्पा ठरतो. २०२४ मध्ये त्यांनी 'मराठा गल्फ कप' जिंकून आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला होता. २०१८ मध्ये इन्फंट्री चषक आणि आताच्या २०२५ साली पुन्हा या स्पर्धेत विजय मिळवून त्यांनी आपल्या सातत्याची साक्ष पटवली. गल्फच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे.