

बेळगाव ः आमदारांना सांगितले तरी रस्ता होत नाही. नगरसेवकांना सांगितले तरी उपयोग होत नाही. महापालिका अधिकार्यांना सांगितले तरी दुर्लक्ष केले जाते. यामुळे संतापलेल्या चव्हाट गल्लीतील रहिवाशांनी खराब रस्त्याला तीन वर्षे झाली म्हणून केक कापून आणि बोंब मारून अनोखे आंदोलन गुरुवारी केले.
गेल्या तीन वर्षांपासून रस्ता खोदकामानंतर तसाच सोडून दिल्यामुळे संतप्त रहिवाशांनी होळीच्या दिवशी रस्त्याचा वाढदिवस साजरा करत केक कापला. शिमग्याची बोंब मारत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. चव्हाट गल्लीतील रहिवासी तीन वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. रस्त्याचे खोदकाम झाल्यानंतर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे, रहिवाशांना खड्डे, चिखल आणि धुळीतूनच प्रवास करावा लागत आहे. आमदार, नगरसेवक आणि महापालिका अधिकार्यांकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे, गुरुवारी होळीच्या दिवशी संतप्त लोकांनी रस्त्याच्या दुरवस्थेचा तिसरा वाढदिवस साजरा केला. रस्त्यावर केक कापून निषेध नोंदवण्यात आला. आम्ही केवळ केक कापून थांबणार नाही. रस्ता जर वेळेत दुरुस्त झाला नाही तर पुढील वर्षीही असाच वाढदिवस साजरा करून प्रशासनाचा निषेध नोंदवू, असा इशारा रहिवाशांनी दिला.