

बेळगाव ः महापालिकेत येत्या सोमवार (दि. 19) आणि मंगळवारी (दि. 20) तीन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. पाणीपुरवठा, महसूल आणि आरोग्य विभागाच्या बैठका महापौर मंगेश पवार घेणार आहेत.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एलअँडटी कंपनीच्या कामाबद्दल नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. ठिकठिकाणी खोदाई करण्यात येत आहे. खोदाई केलेली जागा व्यवस्थित बुजविण्यात येत नाही. वेळेवर गळती काढण्यात येत नाही. 24 तास पाणीपुरवठ्याची योजना लांबत चालली आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.
महसूल विभागावर नगरसेवकांनी अनेक आरोप केले आहे. ई-आस्तीसाठी पैशांची मागणी केली जात आहे. लोकांची वेळेवर कामे करण्यात येत नाहीत. घरबसल्या ऑनलाईन अर्ज करण्याची सोय आहे. पण गेल्या चार महिन्यांपासून लोकांना ई-आस्तीचे प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला होता. या विषयावर मंगळवारी (दि. 20) बैठक होणार आहे. तर मोकाट कुत्री, स्वच्छता, व्यापार परवाने या विषयावर आरोग्य विभागाचीही याच दिवशी बैठक होणार आहे. दोन दिवसांत तीन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. महापौरांचा कार्यकाळ संपत आला असताना मंगेश पवार वेगाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे.