

बेळगाव ः ऑनलाईन भामटे आतापर्यंत फक्त तुमच्या बँक खात्यातील रक्कम हडप करत होते. परंतु, त्यांची मजल आता यापुढे गेली असून समोरच्याच्या नावे ऑनलाईन कर्ज मंजूर करून तेदेखील आपल्या नावावर वर्ग करून घेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याच्याही पुढे जाऊन कॉल डाइव्हर्ट करूनही फसवणूक झाली आहे. अशा पद्धतीने बेळगाव परिसरात दोघांची तब्बल 28 लाखांची फसवणूक झाल्याची नोंद शहर सीईएन विभागात झाली आहे.
एका लष्करी जवानाने घरातील डिश टीव्ही एक वर्षासाठी रिचार्ज करण्यासाठी किती रक्कम लागेल, हे गुगलवर सर्च केले. हेल्पलाईन क्रमांकावर फोन केल्यानंतर तो कॉल अधिकृत डिश कंपनीला न जाता ऑनलाईन भामट्याकडे गेला. त्याने आलेल्या फोननुसार रिचार्ज करत फोन बंद केला. परंतु, थोड्या वेळात पुन्हा फोन करत तुमचे रिचार्ज झालेले नाही. मी सांगतो ती प्रक्रिया पूर्ण करा, असे सांगितले. आधी या भामट्याने डायल पॅड ओपन करण्यास सांगत कोड डायल करण्यास सांगितला. तो कोड डायल करताच आलेला ओटीपी भामट्याने मागवून घेतला. त्याद्वारे भामट्याने खात्यातील 3 लाख 70 हजार रू. आपल्या बँक खात्यावर वर्ग करून घेतले. ही प्रक्रिया पार पाडताना भामट्याने या जवानाच्या फोनचा सर्व तपशील मिळवला होता. त्यामुळे एवढ्यावरच न थांबता त्याने या जवानाच्या नावावर चक्क ऑनलाईन कर्जासाठी अर्ज भरला. ते कर्ज तातडीने मंजूर झाले. ती 5 लाख 80 हजाराची रक्कमही भामट्याने आपल्या खात्यावर वर्ग करून घेतली. हा सर्व प्रकार 25 डिसेंबर 2025 रोजी घडला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 डिसेंबर रोजी कर्जाची पावती आल्यानंतर या लष्करी जवानाला धक्का बसला. त्यांनी नुकतीच सीईएनमध्ये याबाबतची फिर्याद दाखल केली आहे.
कॉल डाईव्हर्टद्वारे 18 लाखांचा गंडा
14 जानेवारी रोजी फसवणुकीच्या वेगळ्याच प्रकाराची नोंद शहर सीईएन विभागात झाली आहे. बाबले गल्ली अनगोळ येथील निलेश नामक तरुणाच्या खात्यावरील 18 लाख रूपये 10 जानेवारी रोजी अचानक गायब झाले. त्याने याची खातरजमा केली तेव्हा एकाच मोबाईलमध्ये असलेल्या दोन सीमपैकी एका सीमचा क्रमांक अन्य मोबाईलवर डाइव्हर्ट करून घेतल्याचे स्पष्ट झाले. त्याद्वारे भामट्यांनी ही रक्कम लाटल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, हा कॉल डाइव्हर्ट कसा झाला? हे अद्याप या तरुणालाही समजलेले नाही. त्याने सीईएनमध्ये फिर्याद दिली असून पोलिसांकडून याचा शोध सुरू आहे.