

बेळगाव : वडगावची ग्रामदेवता मंगाईदेवी यात्रेनिमित्त मंगळवारी हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली. मिरवणूक, गार्हाणे उतरविणे, ओटी भरणे हे कार्यक्रम पारंपरिक उत्साहात पार पडले. बेळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील भाविकांची गर्दी लक्ष वेधून घेत होती.
सोमवारी (दि.21) रात्री धार्मिक विधी झाल्यानंतर मंगळवारी सकाळी देवीचे हक्कदार, पंचमंडळी व ग्रामस्थांतर्फे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. पाटील गल्ली, विष्णू गल्ली, वझे गल्ली, राजवाडा कंपाऊंड, नाझर कँप, पिंपळकट्टा ते मंगाई मंदिर अशी मिरवणूक निघाली. भाविकांकडून देवीचा जयघोष व भंडार्याची उधळण केली जात होती. रस्त्यांवर भंडार्याचा खच पडला होता. दुपारी बारा वाजता आरती करून गार्हाणे उतरविण्याचा कार्यक्रम झाला. श्रीफळ वाढविणे व ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली. ओटी कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू राहिल्याने महिलांची गर्दी होती. दोन रांगांतून दर्शनाची सोय केल्याने मंदिर आवारात कोणताही गोंधळ नव्हता. पावसाची उघडीप असल्याने शिस्तबद्धरीत्या व शांततेत दर्शनाचा लाभ घेता आला. मंदिर आवारात पोलिस बंदोबस्त तैनात होता.
मंगाइंदेवी यात्रेत दरवर्षी भाविकांकडून मंदिर आवारात कोंबड्या उडविण्याची प्रथा होती; मात्र प्रशासनाने आदेश काढल्याने तसेच सलग दुसर्या वर्षी दयानंद स्वामी यांनी जागृती केल्याने यंदा कोंबड्या उडविण्याची प्रथा बंद झाली.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मंगाई यात्रोत्सवात पशुबळीवर निर्बंध असल्याचा आदेश काढला होता. यात्रोत्सवात पहिल्या दिवशी विश्व प्राणी कल्याण मंडळातर्फे दयानंद स्वामी यांच्या नेतृत्वाखाली पशूहत्येविरोधात जागृती करण्यात आली. बकरा व कोंबड्याचा बळी देण्याची परंपरा असली तरी तो कायद्याने गुन्हा असल्याचे स्वामींनी सांगितले.
प्रशासनाचा आदेश आणि स्वामींच्या जागृतीमुळे पशुहत्येचे प्रमाण घटले आहे. पावसाच्या उघडिपीमुळे भाविकांची मोठी गर्दी झाली.
मनोहर हलगेकर, माजी नगरसेवक, वडगाव
मंगाईदेवीची तीन राज्यांत ख्याती असल्याने भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. गर्दी लक्षात घेऊन नेटके नियोजन करण्यात आले. त्यामुळे दर्शनाचा लाभ भाविकांनी शांततेत घेतला.
विनायक चव्हाण-पाटील, हक्कदार, मंगाईदेवी