

कारदगा : कुन्नूर विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या भाजप आघाडी पुरस्कृत जय हनुमान विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळविला. विरोधी गटाला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. निवडणूक अधिकारी म्हणून गोविंदगौडा पाटील यांनी काम पाहिले.
निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. चुरशीने झालेल्या मतदानात कृषी संघाच्या 997 पैकी 906 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत सत्ताधारी गटाचे आनंदा कणगले, कल्लाप्पा घोडसे, संजय जाधव, ज्ञानदेव कुलकर्णी, मंगल शिंदे, शैलजा पाटील, शिधाप्पा धनगर, दादासाहेब घाटगे, बाबू मधाळे, शामराव बुरुड, दाजीराव करडे विजयी झाले. काँग्रेसप्रणित ग्रामविकास पॅनेलचे केवळ शशिकांत कोणे हे विजयी झाले.
पॅनेल प्रमुख व हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक श्रीकांत कणगले म्हणाले, आ. शशिकला जोल्ले व माजी खा. अण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली कृषी संघाची निवडणूक लढविण्यात आली. सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या पॅनेलला विजयी केल्याने सभासद व शेतकर्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू.
यावेळी विजय पाटील, संजीव खोत, महादेव गोडसे, किरण कोपर्डे, सागर पवार, भैरवनाथ पाटील, पिंटू पाटील, सुधाकर चौगुले, सातू खोत, राहू कणगले, किरण माने, कृष्णा दळवी, भैरवनाथ कणगले, अमोल कोळी, बाबासाहेब चौगुले आदी उपस्थित होते. सचिव अमित मगदूम यांनी आभार मानले.