Belgaum News : शरदाचे चांदणे रुपेरी; आज अनुभवा कोजागरी

बेळगावात रंगणार कार्यक्रम : खगोलशास्त्रीय, कृषी, सांस्कृतिक व धार्मिकही महत्त्व
Belgaum News : शरदाचे चांदणे रुपेरी; आज अनुभवा कोजागरी
Published on: 
Updated on: 

बेळगाव : नवरात्रौत्सवात शक्ती व बुद्धीच्या देवतांची आराधना करून विजयादशमीला केलेले सीमोल्लंघन, पावसाअभावी संकटात सापडलेली पिके, परतीच्या पावसाने मारलेली दडी आणि दीपोत्सवाचे वेध अशा पार्श्वभूमीवर शहर परिसरात रविवारी (दि. २५) कोजागरी पौर्णिमा साजरी होणार आहे. यानिमित्त मंदिरात धार्मिक तर शहरातील संस्थांतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत.

कोजागरी पौर्णिमेदिवशी रात्री दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहून त्याचा नैवेद्य दाखवणे आणि मग ते दूध पिणे इतकेच सर्वसामान्य लोकांना माहीत असते. हा उत्सव अश्विन पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असल्याने मोठा दिसतो. चंद्र हा शीतल आणि आल्हाददायक गोष्टींचे प्रतीक असल्याने त्याची पूजा करणाऱ्यांनाही चंद्रासारखी शीतलता मिळते, असे मानले जाते.

यंदा आश्विन शुक्ल पौर्णिमा तिथी २५ रोजी सकाळी ११.५६ वाजता सुरू होऊन २६ रोजी सकाळी ९.४१ वाजता समाप्त होईल. पौर्णिमा तिथी दोन दिवसांमध्ये येत असली, तरी कोजागरी पूजेच्या रात्रीचा विचार करता रविवार (दि.२५) हा मुख्य दिवस आहे.

कोजागरीला नवान्न म्हणजे नवीन पिकवलेल्या धान्याने जेवण बनवण्याची प्रथा आहे. लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची रात्री पूजा केली जाते. पूजा झाल्यावर पोहे आणि नारळाचे पाणी देव आणि पितर यांना समर्पित करुन नंतर नैवेद्य म्हणून ग्रहण केला जातो. काही ठिकाणी शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्यात दूध आटवून चंद्राला त्या आटीव दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य म्हणून ते दूध ग्रहण केले जाते. चंद्राच्या प्रकाशात एकप्रकारची शक्ती असते, जी आरोग्यदायी असते, असे म्हटले जाते. या रात्री जागरण करून करमणुकीसाठी निरनिराळे बैठे खेळ खेळले जातात.

कृषी संस्कृती

कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरीवर्गात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ता, बदाम, वेलदोडे, जायफळ, साखर घालून लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखवला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू दिल्यानंतर दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. कोजागरी पौर्णिमेचे खगोलशास्त्रीय, कृषी, सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व असून विविध मंदिरांमध्ये पूजा-अर्चा आयोजित केली आहे. लक्ष्मीची उपासनाही करण्यात येणार आहे.

वैश्यवाणी समाजातर्फे कोजागरी

समादेवी संस्थान वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना, वैश्यवाणी महिला मंडळ व चिदंबर राजाराम महाराज, पांडुरंग महाराज समाधी मंदिर हळदीपूर शाखा मठ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ( दि. २५ ) सायंकाळी ५ वाजता रामनाथ मंगल कार्यालय, भाग्यनगर येथे कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. कोल्हापूरचे बांधकाम व्यावसायिक प्रकाश देवलापूरकर प्रमुख पाहुणे असतील. शिवाय आर्यन ऑर्केस्ट्राचा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. वैश्यवाणी समाजातील उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कारही होणार आहे. नवरात्रौत्सवात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news