बेळगाव : महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी लोकांशी मराठीत बोलत असल्यामुळे पोटशूळ उठलेल्या कन्नड अंमलबजावणी प्राधिकरणाच्या पदाधिकार्यांनी कन्नड न बोलल्यास नोटीस बजावण्यात येईल, असा तुघलकी इशारा दिला.
महापालिका सभागृहात गुरुवारी (दि. 10) कन्नड अंमलबजावणी प्रगती आढावा बैठक झाली. यावेळी अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम बिळीमले आणि सचिव संतोष हणगल यांनी कन्नड भाषेच्या सक्तीसाठी विविध सूचना केल्या.
सरकारी आदेशानुसार व्यावसायिक कारणांसाठी कार्यालयांमध्ये कन्नड भाषा अनिवार्य आहे. जनतेला सेवा कन्नडमध्येही पुरवल्या पाहिजेत. कार्यालयीन आदेशपत्रांमध्ये कन्नडचा वापर करावा.
महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांनी कन्नडचा वापर करावा. सरकारच्या आदेशानुसार सर्व नामफलकांवरील 60 टक्के भाग कन्नडमध्ये असावा. महापालिकेने याबाबत कार्यवाही करावी. कन्नड आणि संस्कृती विभागाची वडगाव येथील सीमा इमारतीचे योग्य व्यवस्थापन होत नाही. वेगा हेल्मेटमधून कन्नड कर्मचार्यांना काढून टाकल्याबद्दल तक्रारी येत आहेत. त्यामुळे, कंपनीला भेट देऊन तपासणी करावी, असे डॉ. बिळीमले यांनी सांगितले.
कार्यालयीन वेळेत कन्नड भाषा न वापरल्याबद्दल जनतेकडून तक्रारी आल्यास त्यांच्याविरुद्ध नोटीस बजावली जाईल. कन्नड फलक नसलेल्या दुकाने, स्टॉल आणि व्यावसायिकांचे परवाने रद्द करा, असे सचिव हणगल यांनी सांगितले.
यावेळी आयुक्त शुभा. बी, कन्नड व संस्कृती विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री, उदयकुमार तळवार, रेश्मा तालीकोटी आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी बैठकीला उपस्थित होते.