

बेळगाव : महानगर पालिकेने शहरात कन्नडसक्ती अधिक तीव्र केली आहे. या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाने कन्नडसक्ती मागे न घेतल्यास ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जनआंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती माजी आमदार मनोहर किणेकर यांनी मंगळवारी दिली. आंदोलनाआधी जिल्हाधिकार्यांची भेट घेतली जाणार आहे. तरीही सक्ती सुरूच राहिल्यास आंदोलनाच्या जागृतीसाठी गावोगावी बैठका घेतल्या जाणार आहेत.
मराठा मंदिरात मंगळवारी (दि. 15) मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानावरून किणेकर बोलत होेते. कन्नडसक्ती विरोधात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना लवकरच निवेदनही दिले जाणार आहे.
किणेकर म्हणाले, 2004 पासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात आहे. तरीही मनपात कन्नड सक्ती केली आहे. सर्वत्र कन्नड कारभार करण्याची सूचना जारी करण्यात आली आहे. त्याला आमचा विरोध आहे.
मध्यवर्तीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर म्हणाले, सीमाभागात मराठी भाषिक मोठ्या संख्येने आहेत. भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे सहआयुक्त बेळगावात आले होते. त्यांना माहिती दिली होती. सरकारी कार्यालयात मराठीतून कागदपत्रे मिळावीत, यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. लढा तीव्र करू.
गोपाळ देसाई म्हणाले, घटक समितींची बैठक गावोगावी घेऊन चर्चा केली जाणार आहे. बेळगाव, खानापूर, निपाणी, बिदर, भालकीतून कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यावेळी आर. एम.चौगुले, गोपाळ पाटील, रणजित चव्हाण-पाटील, जयराम देसाई, अॅड. राजाभाऊ पाटील, बी. डी. मोहनगेकर, मोनाप्पा पाटील, आर. के. पाटील, मनोहर हुंदरे, रणजित पाटील, विलास बेळगावकर, मुरलीधर पाटील, अजित पाटील, अनिल पाटील, रावजी पाटील, रामचंद्र मोदगेकर, मल्लाप्पा गुरव, अॅड. एम. जी. पाटील, मारुती परमेकर, अॅड. प्रसाद सडेकर आदी उपस्थित होते.
सीमाप्रश्न तज्ज्ञ समितीत ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची नुकतीच निवड केली आहे. सीमाभागातील जनतेची तळमळ त्यांना माहिती असून त्यांची निवड सीमा चळवळीला मोठा दिलासा देणारी आहे. त्यासाठी मध्यवर्ती समितीचे सदस्य लवकरच त्यांची भेट घेऊन सत्कार करणार असून सीमाबांधवाच्या व्यथा मांडणार असल्याचे मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी सांगितले.