

निपाणी : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (एएचपी) जी+२ प्रकारच्या घरकुलांसाठी पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्याच्या प्रक्रियेला गती देत निपाणी नगरपालिकेने लाभार्थी व नागरिकांसाठी आक्षेप नोंदविण्याची मुदत वाढविली आहे. आता संबंधितांना २० जुलैपर्यंत लेखी हरकती सादर करता येणार असल्याचे नगरपालिकेने सार्वजनिक प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
नगरपालिकेने यापूर्वी चार हप्ते भरलेल्या लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे व पावत्या मागविल्या होत्या. त्यानुसार प्राप्त झालेल्या पावत्या व उपलब्य नोंदींची पडताळणी करून १०१२ लाभार्थ्यांची ज्येष्ठता यादी तयार करण्यात आली होती ही यादी नगरपालिकेच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करून तत्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. या कालावधीत ९ लाभार्थ्यांनी आपली नावे यादीत नसल्याबाबत आक्षेप नोंदविले.
त्यानंतर नगरपालिकेच्या महसूल विभागाने संबंधित १०२१ लाभार्थ्यांच्या घरांची व वास्तव्यासंदर्भातील प्रत्यक्ष पाहणी करून पात्र आणि अपात्र अशा दोन स्वतंत्र याद्या तयार केल्या असून त्या नगरपालिकेच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या याद्यांबाबत कोणाला आक्षेप असल्यास आवश्यक पुराव्यांसह नगरपालिकेकडे लेखी हरकत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वी आक्षेप नोंदविण्याची अंतिम मुदत ४ जुलै होती. मात्र नागरिकांच्या सोयीचा विचार करून ती वाढवून २० जुलै २०२६ करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी पारदर्शक पद्धतीने निश्चित करण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह हरकती सादर कराव्यात, असे आवाहन निपाणी नगरपालिकेच्या आयुक्तांनी केले आहे.