Devendra Fadnavis : नागपूर अधिवेशनानंतर 'उच्चाधिकार' बैठक

मुख्यमंत्री फडणवीस यांची मध्यवर्ती म. ए. समितीला ग्वाही; समितीची लिंबाळेंविरुद्धही तक्रार
Devendra Fadnavis : नागपूर अधिवेशनानंतर 'उच्चाधिकार' बैठक
Published on: 
Updated on: 

बेळगाव : नागपूरमध्ये विधिमंडळाच्या होणाऱ्या हिवाळी अधिवेशनानंतर लगेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक बोलावू, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सीमाप्रश्र्नी सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याचे कामकाज नियमित सुरु व्हावे, यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जाते.

सीमाप्रश्र्न गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित असून या प्रश्नासंदर्भात गेल्या ८ जुलैरोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीतील निर्णयांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये नाराजी असून, कोल्हापूरमध्ये तातडीने उच्चाधिकार समितीची बैठक बोलवावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने केली.

भाजपच्या 'लोकशाही वाचवा' मोहीमेसाठी बेळगावात आलेल्या मुख्यमंत्र्यांची शनिवारी सांबरा विमानतळावर मध्‍यवर्ती म. ए. समितीच्या नेत्यांनी भेट घेतली. १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी सीमाप्रश्नासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मुख्‍यमंत्र्यासमोर तीव्र निषेध नोंदवण्‍यात आला.

सीमाभागातील मराठी भाषिकांना आजही भाषिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय पातळीवर कर्नाटकाच्या दमनशाहीला सामोरे जावे लागते. तरीही सीमाप्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षित कार्यवाही होताना दिसत नसल्याची खंत मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाच्या दाव्याबाबत महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या ज्येष्ठ विधिज्ञांची तातडीने बैठक बोलवावी. दाव्याची सद्यस्थिती, पुढील कायदेशीर रणनीती आणि सुनावणी लवकरात लवकर होण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करावी, असेही आवाहन समिती नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना केले.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर, रणजीत चव्‍हाण- पाटील, उमेश पाटील, सतीश देसाई, नेताजी जाधव, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, खानापूर समितीचे माजी आमदार दिगंबर पाटील, आबासाहेब दळवी, गोपाळ पाटील यांच्‍यासह कार्यकर्ते उपस्‍थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.