

बेळगाव : सोने भिशी जीवन संपवणे प्रकरणी तिघांच्या जीवन संपवणे नंतर पोलिसांनी याचा गांभीर्याने तपास केला. संतोष कुर्डेकर यांनी डेथनोटमध्ये जबाबदार धरलेल्या सोने कारागिराच्या घरावर छापा टाकला. त्याच्या घरात 49 लाखाचे 661 ग्रॅम सोन्याचे दागिने व 7 लाख 70 हजारांची रोख रक्कम मिळाली. दरम्यान कुर्डेकर कुटुंबीयांना छळणार्यांच्या यादीत कुडतरकर दाम्पत्यासह आणखी दोघांची नावे समोर आली असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना अटक कररून कारागृहात पाठविण्यात आले.
अटक केलेल्या संशयितांमध्ये राजेश अच्युत कुडतरकर (वय 42, रा. केशवनगर, वडगाव), भास्कर ऊर्फ कृष्णा नारायण सोनार ( 47, रा. टिचर्स कॉलनी, दुसरा क्रॉस, खासबाग) व नानासो हणमंत शिंदे (35, रा. बिच्चू गल्ली, शहापूर) यांचा समावेश आहे. या प्रकरणी चौथी संशयित म्हणून रिना राजेश कुडतरकर (वय 40, रा. केशवनगर, वडगाव) यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
सोन्याच्या भिशीमध्ये नुकसान झाल्याने बुधवारी तिघांनी पोटॅश पिऊन आत्महत्या केल्याची घटना जोशीमळा, खासबाग येथे उघडकीस आली होती. यामध्ये संतोष गणपती कुर्डेकर (47), सुवर्णा गणपती कुर्डेकर (52) व मंगल गणपती कुर्डेकर (वय 85, तिघेही रा. जोशी मळा, खासबाग) या तिघांचा मृत्यू झाला तर चौथी महिला सुनंदा गणपती कुर्डेकर (50) या अत्यवस्थ बनल्या आहेत. त्यांच्यावर अद्याप अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले.
या प्रकरणाचा तपास शहापूर पोलिसांनी गांभीर्याने घेतला. या प्रकरणातील मुख्य संशयित राजेश कुडतरकर याच्या घराची गुरुवारी सकाळी मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली झडती घेण्यात आली. यावेळी त्याच्या घरात 661 ग्रॅमचे सोन्याचे दागिने व 7 लाख 70 हजारांची रोख रक्कम सापडली. शहापूरचे निरीक्षक एस. एस. सीमानी यांनी हा मुद्देमाल कायदेशीररीत्या ताब्यात घेतला.
संतोष कुर्डेकर यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत भास्कर सोनार व नानासो शिंदे या दोघांच्या नावाचा उल्लेख होता. त्यानुसार त्यांचीही झडती घेतली. भास्करने 40 ग्रॅम तर नानासो याने 30 ग्रॅम सोने घेऊन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला. कुडतरकर याच्यासह तिघांना अटक करून त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता कारागृहात रवानगी केली. पोलिस आयुक्त भूषण बोरसे, डीसीपी रोहन जगदीश, डीसीपी निरंजनराजे अर्स, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. एस. सीमानी यांनी ही कारवाई केली. या कारवाईत उपनिरीक्षक मणीकंठ पुजारी, श्रीमती एस. एन बसव्वा, एएसआय बी. ए. चौगुला, पोलीस नागराज एन. ओसाप्पगोळ, एस. एम. गुडदैगोळ, संदीप बागडी, श्रीशैल गोकावी, श्रीधर तळवार, अजित शिपुरे, कु. आर. राजश्री यांनी भाग घेतला.