

बेळगाव : जिल्ह्यात राबविण्यात येणारी ठिबक सिंचन, पाणी उपसा व तलाव भरणीचे प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत. तसेच पाटबंधारे खात्याची रखडलेली विविध कामे वेळेवर पूर्ण करावीत, असे आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. जिल्हा पंचायत सभागृहात मंगळवार दि. 8 रोजी आयोजित विकास आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
मंत्री जारकीहोळी म्हणाले, सध्या सुरू असलेली कामे उच्च दर्जाची करून हातावेगळी करावीत. तसेच दुरुस्तीची कामे जलदगतीने पूर्ण करून कामांच्या दर्जाबाबत कोणतीही कमतरता राहणार नाही, याची खात्री करावी. तलाव भरणी प्रकल्प राबविताना पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच सिंचन प्रकल्पांसाठी आवश्यक भूसंपादन करावे. यासंदर्भातील भरपाईचे वाटप वेळेत करुन भरपाई वितरणाच्या कामात विलंब होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या. कृती आराखड्यानुसार मंजूर केलेली कामे जलदगतीने पूर्ण करावीत. हाती घेतलेली कामे कोणत्याही कारणास्तव अपूर्ण राहू नयेत, याची काळजी घेऊन कामाचा दर्जा राखावा, असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.
सध्या पाटबंधारे खात्यात 712 पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात 31 सिंचन प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. त्यापैकी 4 ठिबक सिंचन, 7 पाणी उपसा जलसिंचन प्रकल्प, 6 उपसा सिंचन प्रकल्प, 8 तलाव भरण्याचे प्रकल्प तसेच इतर 6 प्रकल्प प्रगतीपथावर असल्याची माहिती या योजनांचे मुख्य अभियंत्यांनी दिली. यावेळी आमदार दुर्योधन ऐहोळे, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह पाटबंधारे खात्याचे अधिकारी उपस्थित होते.