

पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्रॅव्हलरने टँकरला दिलेल्या जोरदार धडकेत झालेल्या भीषण अपघातात ६ ठार तर १५ जखमी झाले. या अपघातात बेळगावचे ४ भाविक ठार झाल्याची माहिती आहे. उज्जैन महाकालचे दर्शन घेऊन परततेवेळी हा अपघात आज (दि.७) पहाटे ३ वाजता मध्यप्रदेशातील इंदोर जिल्ह्यातील मानपूरजवळ झाला. या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा बेळगाव शहर हळहळले आहे. (Indore Accident)
प्रयागराज येथे सुरू असलेल्या महा कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या बेळगावातील चार जणांसह शुक्रवारी सकाळी मध्य प्रदेशातील इंदूरजवळ झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. याआधी कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. तर एका भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. त्यात आता पुन्हा या दुर्दैवी अपघाताने चार बळी घेतल्यामुळे अवघ्या शहरावर शोककळा पसरली आहे. (Indore Accident)
प्रयागराज कुंभमेळ्याहून उज्जैन येथे महाकालचे दर्शन घेण्यासाठी बेळगावचे काही भाविक दाखल झाले होते. उज्जैन महाकालचे दर्शन घेऊन परतणाऱ्या ट्रॅव्हलर वाहनात आणि टँकरमध्ये शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास भीषण धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती, कि यामध्ये घटनास्थळीच चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन बेळगावच्या भाविकांचा समावेश आहे. तर दोन इंदोर येथील भाविकांचा समावेश आहे. अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या बेळगावच्या अन्य दोन महिला भाविकांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ज्योती प्रकाश खेडेकर (वय ६४, आनंदनगर, वडगांव बेळगाव), संगीता मेस्त्री (वय 52 रा. दत्त मंदिर जवळ, शिवाजी नगर, बेळगाव), नीता पाटील (वय ४६, रा. क्रांती नगर, गणेशपूर बेळगाव) आणि सागर शहापूरकर (वय 45 रा. होसुर बेळगाव) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. बेळगावच्या गणेशपूर भागातील एका व्यक्तीने या सहलीचे आयोजन केले होते. सदर टेम्पो ट्रॅव्हलर वाहनातून १९ जणांचा समूह प्रयागराजसाठी रवाना झाला होता. कुंभमेळ्याहून परतताना उज्जैन येथील महाकालचे दर्शन घेण्यासाठी सदर भाविक दाखल झाले. त्यांनतर बेळगावच्या दिशेने परतीचा प्रवास करत असताना मध्यप्रदेशातील मुहू जवळील मानपुर भेरु घाटातील उतरणीला ट्रॅव्हलरने थांबलेल्या टँकरला जोराची धडक दिली. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी ज्योती प्रकाश खेडेकरआणि संगीता मेस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला तर नीता पाटील आणि सागर शहापूरकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.