

खानापूर : नंदगड येथील संगोळ्ळी रायाण्णा यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन हुबळीला परत जाणाऱ्या दुचाकीला कित्तूरजवळ अपघात झाल्याने दोन तरुण जागीच ठार झाले. रमेश आंदेप्पा आंबिगेर (२०, रा. ईश्वर नगर, जुनी हुबळी) आणि मदन चंद्रकांत मेटी (२०, रा. एस. एम. कृष्णानगर हुबळी) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
रविवारी (दि.२६) संगोळ्ळी रायण्णा यांच्या हुतात्मा दिनानिमित्त विविध भागातून तरुण व भाविक नंदगड येथील रायण्णा यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावतात. हुबळी येथून रमेश आणि मदन दुचाकीवरून आज सकाळी नंदगड येथे आले होते. दर्शनानंतर ते हुबळीला परतत होते. कित्तूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती महामार्गालगतच्या झाडावर जाऊन धडकली. त्यात दोघांचाही मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कित्तूर येथील शासकीय आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, डीवायएसपी रवी नायक, कित्तूरचे पोलीस निरीक्षक शिवानंद गुडनगट्टी आणि पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गंगोल यांनी भेट देऊन पाहणी केली. या अपघाताची नोंद कित्तूर पोलीस स्थानकात करण्यात झाली आहे.