

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
ईदनिमित्त केलेली विद्युत रोषणाई पाहण्यासाठी गेल्यानंतर धक्का लागून विद्युत रोषणाई बंद पडली. यानंतर दोन गटांमध्ये झालेल्या वादातून एका गटाने दुसर्या गटातील चौघांवर जांबिया व कोयत्याने हल्ला केला. यामध्ये चौघेजण जखमी झाले. रविवारी रात्री दहाच्या सुमारास रुक्मिणीनगर येथे ही घटना घडली. जखमींमध्ये तन्वीर रियाज निजामी (वय 26, रा. सातवा क्रॉस, उज्ज्वलनगर), शाकीर निजामुद्दिन, महंमदकैफ नायक व साहील भंडारी (सर्व जण रा. उज्ज्वलनगर) यांचा समावेश आहे.
याबाबत माहिती अशी की, रविवारी ईद-ए-मिलाद असल्याने जुलूससाठी रूक्मिणीनगर येथे विद्युत रोषणाई केली होती. ती पाहण्यासाठी तन्वीर व त्याचे उपरोक्त तिघे मित्र गेेले होते. यावेळी अनावधानाने रोषणाईला धक्का लागून ती बंद पडली. यामुळे तेथील तरुण चिडले. त्यांनी भरपाई देण्याची मागणी केली. यातून त्यांच्यामध्ये वादावादी झाली. या वादातून रुक्मिणीनगरच्या तरुणांनी या चौघांवर जांबिया व कोयत्याने हल्ला केला. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हारूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी समीर मुल्ला, शाहरूख यांच्यासह अन्य तिघे अशा पाचजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी यातील काही संशयितांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल तपास करीत आहेत.