

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : माझ्याकडे का पाहिले, असा जाब विचारत एका खासगी क्लासच्या शिक्षकावर धारदार शस्त्राने एका माथेफिरू तरुणाने प्राणघातक हल्ला केला. ही घटना माजलगाव शहरातील शिवाजीनगर येथे मंगळवारी (दि.3) रात्री साडेसातच्या दरम्यान घडली. दरम्यान, जखमी शिक्षकाची प्रकृती स्थिर आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरज नानासाहेब सोळंके (रा. मोहखेड, वय 23) हे शहरातील शिवाजीनगर भागात राहतात. याठिकाणी ते पहिली ते सातवी पर्यंतच्या मुलांना शिकवणी देतात. मंगळवारी रात्री साडेसातच्या दरम्यान ते गल्लीत थांबले होते. यावेळी याच भागातील योगेश राऊत (वय 25) त्यांच्यासमोर आला. यावेळी दोघांची नजरा नजर झाली. त्यावेळी योगेश याने सुरेश यांना माझ्याकडे का पाहिलेस? असे म्हणत हातातील शस्त्राने गळ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले.
दरम्यान, शिक्षकावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या गळ्यावर 57 टाके पडले असल्याची माहिती आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान अद्याप माथेफिरू तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.