

बेळगाव, गोकाक; पुढारी वृत्तसेवा : पतीने आधी पत्नीचा व येथून दहा पावलांवर घर असलेल्या एका घरातील तरुणाचा धारदार विळ्याने वार करून खून केला. मंगळवारी दुपारी 3 ते 3.15 च्या सुमारास हे दुहेरी खून प्रकरण अक्कतंगेरहाळ (ता. गोकाक) येथे घडले.
रेणुका यल्लाप्पा माळगी (वय 42) व मल्लिकार्जुन यल्लाप्पा जगदार (वय 40, दोघेही रा. अक्कतंगेरहाळ, ता. गोकाक) अशी मृत पावलेल्यांची नावे आहेत. रेणुकाचा पती यल्लाप्पा लक्काप्पा माळगी (वय 45, रा. अक्कतंगेरहाळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पतीला या दोघांबाबत अनैतिक संबंधाचा संशय होता. यातूनच हे खून झाल्याचे सांगण्यात येते. परंतु, पोलिसांनी गावातील काही लोकांकडून व मृताच्या पत्नीकडून घेतलेल्या प्राथमिक माहितीनुसार तसे काहीही नव्हते. संशयित आरोपी संशय घेत होता, असे सांगितले.
मृत महिला व मल्लिकार्जुन यांची घरे अवघ्या दहा पावलांवर आहेत. ते एकमेकांशी बोलत होते. परंतु, यल्लाप्पा हा त्यांच्यावर संशय घेत पत्नीसोबत सातत्याने भांडण काढत होता. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याने पत्नीसोबत भांडण काढले. यावेळी घरी तर मल्लिकार्जुन हा त्याच्या घरी होता. दोघांचे जोरजोराने भांडण सुरू झाले. रागाच्या भरात विळ्याने पत्नीच्या मानेवर, गळ्यावर पोटावर, डोकीत, हातावर सपासप वार केले, ती मृत झाल्याचे कळताच रागाच्या भरात बाजूलाच असलेल्या मल्लिकार्जुनच्या घरात घुसला. यावेळी मल्लिकार्जुन आंघोळ करीत होता. त्याच विळ्याने आधी मानेवर, चेहर्यावर, गळ्यावर सपासप वार केले. अवघ्या दहा मिनिटांत दोघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील, चिकोडीचे उपअधीक्षक बसवराज येलिगार यांच्यासह अंकलगीचे उपनिरीक्षक व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
यल्लाप्पा पत्नीवर संशय घेऊन सातत्याने मारबडव करत होता. ती सातत्याने त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती. शेजारी आहे म्हणून बोलते, असे सांगत होते. अनेकदा मृत मल्लिकार्जुनची पत्नीदेखील यल्लाप्पाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होती. तिने मंगळवारी पोलिसांनाही दोघांमध्ये तसे काहीही नसल्याचे सांगितले. परंतु, यल्लाप्पाच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जात नव्हते. यातूनच हे दुहेरी खून प्रकरण घडल्याचे पोलिसांनी सांगितले.