

बेळगाव ः सौंदत्ती येथील रेणुका यल्लम्मा मंदिर आणि डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रिमंडळाने 215 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामध्ये केंद्र सरकारचा 118 कोटी आणि राज्य सरकारचा 97 कोटी रुपयांचा वाटा असून, या माध्यमातून भाविकांना जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा पुरवल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शुक्रवारी (दि. 2) दिली.
या विकासकामांतर्गत 8 हजार भाविकांची क्षमता असलेले भव्य संकुल आणि एकाचवेळी 4 हजार भाविक बसू शकतील अशा भोजन कक्षाची उभारणी केली जाणार आहे. तसेच डोंगरावर येणाऱ्या बैलगाड्यांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असून, तिथे जनावरांसाठी चारा आणि पाण्याची सोयही केली जाईल. याशिवाय 25 अद्ययावत स्वच्छतागृह संकुलेही उभारण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी रोशन यांनी सांगितले. भाविकांच्या सोयीसाठी अनेक लहान-मोठ्या विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे. एक प्रशासकीय इमारतही बांधण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याची कार्यकारी एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.