

बेळगाव : कॅण्टोन्मेंट बोर्ड कार्यक्षेत्रात दुकान थाटण्यासाठी कार्यालयातील महिला अधिकार्याने लाच मागितली होती. त्यामुळे, सीबीआय अधिकार्यांनी मंगळवारी (दि. 9) दुपारी कॅण्टोन्मेंट कार्यालयावर छापा टाकून संबंधित महिलेला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. अधिक चौकशीसाठी तिला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून कथित नोकर भरतीप्रकरणी बेळगावचे कॅण्टोन्मेंट बोर्ड चर्चेत आहे. याप्रकरणी तत्कालीन सीईओंनी आत्महत्या केली. त्यानंतर तीन ते सहा महिन्याच्या अंतराने सीबीआयचे पथक कॅण्टोन्मेंट कार्यालयात अधूनमधून येऊन चौकशी करत आहे. मंगळवारी सीबीआयच्या पाचजणांच्या पथकाने अचानक कार्यालयात हजेरी लावत लाचप्रकरणी कार्यालयातील महिला अधिकार्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरा तपासणी सुरु होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गेल्या चार महिन्यांपासून कॅण्टोन्मेंट बोर्ड कार्यक्षेत्रात एक व्यक्ती दुकान थाटण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, संबंधित महिला अधिकारी त्यात आडकाठी आणत होत्या. तिने संबंधिताकडे पैशाची मागणी केली होती. याची माहिती त्याने सीबीआयला दिली होती. त्यानुसार मंगळवारी लाच स्वीकारताना महिला अधिकारी सीबीआयच्या सापळ्यात अडकली. मंगळवारपासून त्या महिला अधिकार्यांना सीबीआय पथकाने ताब्यात घेतले असून या प्रकरणी चौकशी सुरु आहे.