बेळगाव : आपल्या मुलीबाबत सख्ख्या भावानेच नाहक अफवा पसरवल्याच्या संशयातून भावावर खुनी हल्ला करण्यात आला होता. यातील जखमी भावाचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. विठ्ठल गोविंदप्पा चव्हाण (वय 51, रा. कल्लोळी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दोघा हल्लेखोरांवर आता खुनाचा गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक केल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. भीमाप्पा गोविंदप्पा चव्हाण (रा. कल्लोळी) व लक्ष्मण फडतरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, संशयित भीमाप्पाच्या मुलीचा चार महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. यानंतर ती गर्भवती राहिली; परंतु याबाबतच आपला भाऊ विठ्ठल हा विनाकारण अफवा पसरवत असल्याचा संशय भीमाप्पाला होता. यातूनच भीमाप्पा व त्याचा मेहुणा लक्ष्मण या दोघांनी गेल्या रविवारी काठी व रॉडने त्याच्यावर हल्ला केला होता. यामध्ये विठ्ठल हे गंभीर जखमी झाले होते. घटप्रभा पोलिसांत दोघांविरोधात खुनी हल्ल्याची नोंद करून घेण्यात आली होती. परंतु, रूग्णालयात उपचार असलेल्या विठ्ठल यांचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. या प्रकरणात अन्य काही जणांवर संशय असून त्यांचा शोध सुरू आहे. त्यांनाही लवकरच अटक केली जाईल, असे पोलिस प्रमुखांनी सांगितले.