

बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांचा अवमान करणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शरणकुमार लिंबाळे यांचा निषेध करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सीमावासीयांनी केली आहे. बेळगाव काय पाकिस्तानात आहे का, असे म्हणत बेळगावचा समावेश कर्नाटकात करण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारे वक्तव्य लिंबाळे यांनी केले होते. त्याविरुद्ध बेळगाव, खानापूर, निपाणीसह सीमाभागात संताप व्यक्त होते. मध्यवर्ती म. ए. समिती नेत्यांसह मराठीप्रेमींनी लिंबाळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तर सीमावासीयांची माफी मागावी, अशीही मागणी काही नेत्यांनी केली आहे.
ए. ए. युवा समितीने लिंबाळे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच लिंबाळे यांनी सीमावासीयांची आणि समस्त महाराष्ट्राची माफी मागून राजीनामा द्यावा. साहित्य परिषदेने आणि महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतली नाही तर येत्या काळात समस्त बेळगावकरांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
तसेच साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना देखील सदर आशयाचे निवेदन पाठविण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष अंकुश केसरकर, उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, सूरज कुडूचकर, विनायक कावळे, प्रवीण रेडेकर, श्रीकांत कदम, कौशिक शिंदे आदी उपस्थित होते.