

बेळगाव ः मराठी आणि इंग्रजी भाषेच्या द्वेषाने पछाडलेल्या कन्नड संघटनांना आता भगवा ध्वजही खुपू लागला आहे. सरदार्स हायस्कूल मैदानात शनिवारपासून (दि. 3) सुरू झालेल्या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी मंडपावर भगवा ध्वज, बॅनर इंग्रजीत लावले असल्यामुळे करवेच्या चार महिलांनी मैदानात घुसण्याचा प्रयत्न करून गोंधळ घातला.
सरदार्स मैदानात रविवारी महांतेश कवटगीमठ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आणि प्रदर्शनीय सामने झाले. उद्घाटनाचे सूत्रसंचालन मराठीत करण्यात येत होते. व्यासपीठाच्या मंडपावर भगवा ध्वज लावण्यात आला होता. शिवाय शुभेच्छांचे फलक इंग्रजीत होते. भिंतीवर कन्नड आणि इंग्रजी भाषेत लिहिण्यात आले आहे. पण, इतर भाषांच्या द्वेषाने पछाडलेल्या करवेच्या चार कार्यकर्त्यांना ते दिसले नाही. इथे कन्नडला स्थान देण्यात आलेले नाही. मंडपावर लाल-पिवळा ध्वज का लावण्यात आला नाही, फलकांवर कन्नड का नाही, असे विचारत प्रदर्शनिय सामना सुरू असतानाच मैदानात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याठिकाणी पोलिस आणि बघ्यांची गर्दी झाली. अखेर आयोजकांनी काही इंग्रजी फलक हटविले आणि कन्नड फलक लावण्यात येतील, अशी ग्वाही दिल्यानंतर हा गोंधळ थांबला. क्रीडा क्षेत्रातही भाषिक वाद आणून जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याच्या या प्रकाराबद्दल खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींतून संताप व्यक्त करण्यात आला.