

बेळगाव : जप्त केलेल्या दुचाकींसह पोलिस निरीक्षक उस्मान आवटी, उपनिरीक्षक एस. आर. मुत्तट्टी, एएसआय एम. ए. पाटील आदी.
बेळगाव : शहरातील नामांकित खासगी रुग्णालयासमोरील जागेसह अन्य ठिकाणाहून दुचाकी चोरणार्याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून नऊ दुचाकी जप्त केल्या असून याची किंमत दोन लाख 65 हजार रुपये होते. संतोष बसवराज अंदानी (वय 45, मूळ रा. बनगर गल्ली, गोकाक, सध्या रा. न्यू वैभवनगर, बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, संतोष हा रुग्णालयासमोर तसेच अन्य गर्दीच्या ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकींचे लॉक तोडून चोरुन नेत होता. संशयावरुन त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने शहर परिसरातून नऊ दुचाकी चोरल्याचे आढळून आले. यामध्ये दोन स्प्लेंडर, तीन एक्टिव्हा, सीबीझेड, बजाज पल्सर, हिरो पॅशन आणि बजाज सीटी-100 या दुचाकींचा समावेश आहे.
पोलिस आयुक्त भूषण बोरसे, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या नेतृत्वाखाली एपीएमसीचे पोलिस निरीक्षक उस्मान आवटी, उपनिरीक्षक एस. आर. मुत्तट्टी, साहाय्यक उपनिरीक्षक एम. ए. पाटील, दीपक सागर व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली.