

बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाचा एक भाग म्हणून चव्हाट गल्लीतील मराठी शाळा क्र. 5 व माजी विद्यार्थी संघटनेतर्फे पर्यावरणाचे महत्व आणि मातृभाषेतील शिक्षणाबाबत जागृती करण्यात आली. त्यासाठी परिसरात फेरी काढण्यात आली.
माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष दीपक किल्लेकर यांनी फेरीचे उद्घाटन केले. त्यानंतर फेरीला प्रारंभ झाला. रोपे लावा-रोपे जगवा, शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवावे. मराठी माध्यम भाषेतील शिक्षणाचा कोणताही न्यूनगंड बाळगू नये अशा विविध घोषणा लिहिलेले फलक फेरीत सहभागी विद्यार्थ्यांच्या हाती होते. घोषणा देत चव्हाट गल्ली व परिसरात ही फेरी निघाली. मराठी भाषिक पालकांच्या घरोघरी जाऊन पटसंख्या वाढविण्याबाबतची पत्रके वाटण्यात आली.
चव्हाट गल्लीची शाळा क्र. 5 ही शहराचा मानबिंदू आहे. शाळेला 100 वर्षे झाली असून हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपले जीवन सार्थकी लावले आहे. तसेच देशाच्या प्रगतीत हातभार लावला आहे, असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. फेरीत माजी नगरसेवक पुंडलिक परीट, पंडित पावशे, रवी नाईक, श्रीपत खांडेकर, श्रीकांत कडोलकर, जयवंत पाटील, मुख्याध्यापक पी. के. मुचंडीकर, व्ही. व्ही. पाटील, राजू कांबळे, नाथ बुवा, ए. बी माळी यांच्यासह माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य सहभागी झाले होते.