Khalistan Threat : खलिस्तानच्या नावे बेळगावात धमकी

जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवण्याचा ई-मेल : म्हैसूरचाही उल्लेख
Khalistan Threat
बेळगाव : धमकीच्या ई-मेलनंतर न्यायालय आवारात बॉम्ब शोधपथक व श्वान पथकाद्वारे तपासणी सुरू असताना.
Published on: 
Updated on: 

बेळगाव : जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवून देऊ, अशा धमकीचा ई-मेल कथित खलिस्तान समर्थकांकडून आला असून, त्यामुळे बेळगावात गुरुवारी खळबळ उडाली. बेळगावसह ‘म्हैसूर बोलेगा जय खलिस्तान, खून का बदला खून’ असे उल्लेख मेलमध्ये असून, खबरदारी म्हणून न्यायालयाचा परिसर श्वान आणि बॉम्बशोध पथकाद्वारे पिंजून काढण्यात आला. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर हल्ला झाला होता. त्या कटू आठवणींच्या अठराव्या स्मृतिदिनी गुरुवारी बेळगाव आणि म्हैसूरवर हल्ल्याच्या धमकीचा हा मेल आला आहे. फक्त जिल्हा न्यायालयच नव्हे, तर राज्यातील अन्य ठिकाणेही उडवून देण्याचा उल्लेख या ई-मेलमध्ये आहे.

गुरुवारी दुपारी १२.२५ वा. जिल्हा सत्र न्यायालयाच्या ई-मेल आयडीवर एक मेल आला. मेल पाठवणाऱ्याचे नाव इओ थॉमस असे आहे. त्याने मेलमध्ये काही उमगणाऱ्या आणि काही संदर्भ न लागणाऱ्या इंग्रजी वाक्यांचा उल्लेख केल्याचे दिसून येते. न्यायालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी यतीश दिवाकर मंगर्शी यांनी तातडीने शहर सीईएन पोलिसांत फिर्याद दिली.

‘बचन दलजीत ११/२६ बॉम्ब धमाकीयन विच खतम’, असा उल्लेख मेलमध्ये आहे. ‘११/२६ म्हैसूर बोलेगा खलिस्तान जिंदाबाद, ग्रेनेड नाल खलिस्तानी कर्नाटक आ गया है’, असेही मेलमध्ये म्हटले आहे. २७ डिसेंबर, ३१ डिसेंबर अशा तारखांचा उल्लेख करत ‘खून का बदला खून १९८४’ असे म्हणत अनेक इंग्रजी आणि पंजाबी भाषेत धमकी देण्यात आली आहे. काही शीख व्यक्तींच्या नावांचाही उल्लेख असून, त्यांचा नेमका संदर्भ काय, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. ई-मेलमधील उल्लेखानुसार ही खलिस्तानी धमकी वाटावी, असा तपशील आहे. त्यामुळे नावे एकत्रित करून त्यांचा खलिस्तानी चळवळीशी काही संबंध आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

धमकीचा ई-मेल थेट जिल्हा न्यायालयाच्या मेलवर आल्याने न्यायालय प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली. जिल्हा न्यायालयाचे सीएओ यतीश मंगर्शी यांनी तातडीने शहर सीईएन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस यंत्रणेने तातडीने जिल्हा न्यायालयात तपासणी हाती घेतली. मार्केट निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्वरित श्वानपथकाला बोलावून घेत संपूर्ण परिसर पिंजून काढला.

काय आहे खलिस्तानी चळवळ?

पंजाब तसेच भारतातील काही पंजाबी भाषिक भाग आणि पाकिस्तानी पंजाबचा काही हिस्सा एकत्रित करून शीखांसाठी स्वतंत्र खलिस्तान राष्ट्राची मागणी करणारी चळवळ उभी राहिली, त्याला खलिस्तानी चळवळ असे नाव दिले. परंतु, १९८४ ऑपरेशन ब्लू स्टारद्वारे कारवाईमुळे खलिस्तान चळवळ कमकुवत झाली. तेव्हापासून अधूनमधून खलिस्तानवादी आपली मागणी लावून धरत असतात. आता आलेल्या धमकीच्या मेलमध्येही दलजीत माऊफी यान कताल १९८४ असा उल्लेख दिसून येतो. त्याचा संदर्भच शोधला जात आहे.

श्वानपथक, बॉम्बशोध पथकाद्वारे तपासणी केली आहे. मेल नेमका कोठून आला, याचा शोध घेतला जात आहे. सोशल मीडियासाठी काम करणारी टीम याबाबतची माहिती जमवत आहे. लवकरच ई-मेल कुठून आला, हे शोधून काढू.
-प्रकाश निकम, पोलिस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.