

Karnataka Mid-Day Meal Scheme Corruption
काशिनाथ सुळकुडे
कर्नाटक : शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे (मध्यान्ह भोजन / अक्षर दासोह) हिशेब दुरुस्त करण्यासाठी शिक्षकाकडे १५ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुका अक्षर दासोह योजनेच्या सहाय्यक संचालिका सविता हलकी या लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकल्या आहेत. कार्यालयातच लाचेची रक्कम स्वीकारताना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले.
शारीरिक शिक्षण शिक्षक पी. एम. हेज्जे हे यापूर्वी शिप्पूर हायस्कूलमध्ये कार्यरत होते, तर सध्या ते बेळगाव तालुक्यातील मुत्नाळ हायस्कूलमध्ये सेवा बजावत आहेत. मागील कालावधीतील शालेय पोषण आहाराच्या कॅशबुकच्या नोंदी दुरुस्त करून देण्याच्या कामासाठी सविता हलकी यांनी शिक्षकाकडे १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. काही अहवालांनुसार, यापूर्वीच याच कामासाठी रक्कम घेतल्यानंतरही आणखी पैशांची मागणी करण्यात आल्याने त्रस्त होऊन संबंधित शिक्षकाने लोकायुक्तांकडे तक्रार केली होती.
ही बाब लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर सापळा रचण्यात आला. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुका पंचायत परिसरात असलेल्या अक्षर दासोह योजनेच्या कार्यालयात लोकायुक्त निरीक्षक व्यंकटेश येडहळ्ळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. शिक्षकाकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारत असतानाच अधिकाऱ्यांनी छापा टाकून सविता हलकी यांना रंगेहात ताब्यात घेतले.
लाचेची रक्कम जप्त केल्यानंतर लोकायुक्त पथकाकडून कार्यालयातील कागदपत्रांची कसून तपासणी सुरू आहे. लाच मागणी प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती संकलित केली जात असून, कायद्यानुसार पुढील चौकशी व कारवाई सुरू आहे.
शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या 'अक्षर दासोह' योजनेच्या लेखाजोखा कामातही लाच मागितल्याच्या प्रकारामुळे प्रशासकीय कारभारातील पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कॅशबुक दुरुस्तीसाठी खरोखरच पैसे मागितले गेले होते का आणि कागदपत्रांच्या तपासणीत आणखी काय बाबी समोर येतात, हे लोकायुक्तांच्या तपासातूनच स्पष्ट होईल.