

खानपूर : भीमगड अभयारण्य परिसरात गवळवाडी (ता. खानपूर) येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. प्रकाश कृष्णा गुरव (५५) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
शुक्रवारी (दि.२४) सकाळी ११ च्या सुमारास प्रकाश गुरव हे पत्नीसह शेताकडे जात असताना रस्त्याच्याकडेला थांबलेला गवा त्यांच्या नजरेस पडला नाही. काही अंतर पुढे गेल्यानंतर अचानक गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात प्रकाश गंभीर जखमी झाले. त्यानंतर गव्याने जंगलात धूम ठोकली. प्रकाश यांच्या पत्नीने गावाकडे धाव घेऊन ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले.
जखमी प्रकाश यांना टेम्पोतून खानापूर सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार अरविंद पाटील यांनी दवाखान्यात जाऊन प्रकाश गुरव यांच्या प्रकृतीची चौकशी केली.