

बेळगाव : दिवाळीनिमित्त मुलीकडे निघालेल्या माय-लेकाच्या दुचाकीला अपघात होऊन दुचाकीवरील महिला टिप्पर खाली सापडल्याने जागीच ठार झाली. तंगेव्वा देवाप्पा नायक (43, रा. बडस खुर्द, ता. बेळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी (दि. 22) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पंत बाळेकुंद्रीजवळ हा अपघात झाला.
याबाबत मारीहाळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तंगेव्वा व त्यांचा मुलगा नागराज (23) हे दोघेजण बुधवारी सायंकाळी दुचाकीवरून नेसरगीकडे निघाले होते. सासरी असलेल्या मुलीला भेटण्यासाठी तंगेव्वा जात होत्या. पंत बाळेकुंद्रीजवळ पोहोचले असता समोरून टिप्पर जात होता. चालकाने टिप्पर थोडासा बाजूला घेतल्याने दुचाकीच्या हँडलला स्पर्श झाला. यामुळे तोल जाऊन दुचाकी रस्त्यावर कोसळली. यावेळी तंगेव्वा या थेट टिप्परच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या डोक्यावरून चाक गेले व त्या जागीच ठार झाल्या. नागराज बाजूला पडल्याने त्याला फारसे लागले नाही. घटनेची माहिती मिळताच मारीहाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक इराण्णा पट्टणशेट्टी यांनी सहकार्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.