

बेळगाव ः बेळगावात बसून चक्क अमेरिकन नागरिकांना ऑनलाईन गंडा घालणार्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश बेळगाव पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी 33 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 37 लॅपटॉप, 37 मोबाईल व तीन वायफाय रूटर असा 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेले सर्वजण उत्तर भारतातील गुजरात, दिल्ली, महाराष्ट्र, मेघालय, राजस्थान, उत्तरप्रदेश, झारखंड येथील असल्याची माहिती पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील पोलिस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त बोरसे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, 11 नोव्हेंबर रोजी अंतर्गत सुरक्षा विभागाकडून आलेली माहिती व निनावी पत्राद्वारे बॉक्साईट रोडवरील आझमनगर सर्कलपासून काही अंतरावरील कुमार हॉल येथे सायबर सेंटर सुरू असून तेथे बेकायदेशीर धंदे चालत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे येथे कारवाई केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
बॉक्साईट रोडवरील कुमार हॉल येथे सायबर सेंटर चालवल्यासारखे भासवले जात होते. परंतु, पोलिसांनी जेव्हा सखोल चौकशी सुरू केली तेव्हा येथून अमेरिकन नागरिकांची ऑनलाईन फसवणूक केली जात असल्याचे समोर आले. भारतात जसे ओटीपी, डिजिटल अरेस्टची भीती, शेअर मार्केटचे आमिष दाखवून फसवणूक केली जाते, त्याच प्रकारे अमेरिकेतील नागरिकांची 11 प्रकारे फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
यापैकी एक प्रकार म्हणजे अमेकिरेतील नागरिकाला एसएमएसद्वारे मेसेज पाठवायचा. यामध्ये तुम्ही दिलेली अमेझॉन ऑर्डर लवकरच मिळेल. यामध्ये काही शंका असल्यास खालील अमेझॉन कस्टमर केअर क्रमांकावर फोन करा, असे सांगायचे. यानंतरही समोरून फोन आला नाही तर तुमच्या नावे चुकीची ऑर्डर आली आहे, ती रद्द करावी लागणार आहे, असे सांगायचे. यावेळी अमेरिकन नागरिकाचा फोन आला की त्याच्याशी बोलत राहायचे. यावेळी तो बोलत असताना संबंधिताचा बँक खात्याचा तपशील घ्यायचा. यानंतर त्याच क्रमांकावर पुन्हा फोन करत तुमच्या नावे अनेक बँक खाती ओपन झालेली आहेत. तुमचा कॉल फेडरल ट्रेड कमिशनला जोडून देतो, असे सांगत त्याला भीती दाखवायची. यानंतर संबंधिताचे खाते हॅक करून ऑनलाईन रक्कम हडप करायची, असा प्रकार होत असे.