

Bengaluru Boy killed in blast
चिकोडी: बेंगळूरू शहरातील चीनयानपाळ्य येथील श्रीराम कॉलनीत आज (दि.१५) सकाळी एका घरामध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात आठ वर्षांचा मुबारक या बालकाचा मृत्यू झाला. तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या स्फोटाची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, आजूबाजूच्या दहा घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. जखमींमध्ये कस्तुरमा (३५), सरसम्मा (५०), शब्बीरना बानू (३५), सुब्रमणी (६२), शेख नजीद उल्ला (३), फातिमा (८) यांच्यासह एकूण १२ जणांचा समावेश आहे. सर्व जखमींवर सध्या संजयगांधी नगर आणि जयनगर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
स्फोट कस्तुरी या महिलेच्या घरात झाला असून, शेजारी राहणाऱ्या मुबारक या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्वातंत्र्यदिनी घडलेल्या या घटनेमुळे बेंगळूरूमध्ये उत्साहावर विरजण पडले आहे. स्फोट नेमका गॅसचा होता की बॉम्ब ब्लास्ट, याचा तपास पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा करत आहेत.
घटनास्थळी मुख्यमंत्री सिद्धरामया यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मृत बालकाच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.