

Bal Gandharva Death Anniversary
बेळगाव : बेळगाव आणि उत्तर कर्नाटक भाग हा पूर्वीपासूनच मराठी नाटकांना पोषक होता. त्यामुळे, अनेक मराठी नाटक कंपन्या या भागात दौरे करत असत. मराठी रंगभूमीच्या इतिहासात बालगंधर्वांचे योगदान खूप मोठे आहे. बेळगावाशी बालगंधर्वांचे जिव्हाळ्याचे नाते होते. बेळगावच्या भूमीत बालगंधर्व यांची अनेक नाटके झाली आहेत. मात्र, शहरात विविध चार ठिकाणीच बालगंधर्वांचे नाट्यप्रयोग होत असत. बालगंधर्वांचा मंगळवारी (दि. १५) स्मृतिदिन असून त्यांच्या बेळगावातील आठवणींना उजाळा दिला जात आहे.
बालगंधर्वांची 'गंधर्व संगीत मंडळी' उत्तर कर्नाटकात बेळगाव, विजापूर, हुबळी-धारवाड यांसारख्या शहरांचा दौरा करत असे. या दौऱ्यांमुळे बालगंधर्वांना केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर कर्नाटकसारख्या प्रांतांमध्येही प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांचे गायन आणि स्त्री-भूमिकांमधील अभिनय कन्नड भाषिक प्रेक्षकांनाही खूप आवडत असे. पूर्वीचा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक हा सांस्कृतिकदृष्ट्या एकसंध भाग होता.
त्यामुळे मराठी नाटक कंपन्यांना या भागात प्रेक्षक मिळण्यास कोणतीही अडचण येत नसे. बालगंधर्वांच्या काळातही ही परंपरा कायम होती.
66 वालगंधर्व यांचा आवाज अत्यंत मधुर आणि मोहक होता, ज्यामुळे ते नाट्यसंगीताचे अनभिषिक्त सम्राट बनले. बालगंधर्व यांना ऐकायला आणि पाहायला मिळाले नाही. पण, बेळगावातील जुन्या पिढीला त्यांच्या अभिनय आणि गायनाची पर्वणी मिळाली. जुनी नाट्यवेडी मंडळी बालगंधर्वांच्या नाट्यस्थळांचा उल्लेख करत असत.
प्रभाकर शहापूरकर, ज्येष्ठ गायक, बेळगाव
शहरात रंगुबाई पॅलेसमध्ये गंधर्व कंपनीचा मुक्काम असायचा. तिथे गाण्यांचा सराव सुरु असे. कधीकधी गंधर्व कंपनीतील कलाकारांच्या जेवणाची सोय किर्लोस्कर रोडवरील सहस्त्रबुद्धे खानावळीत (आजची बँक ऑफ महाराष्ट्रची इमारत), बादशाही बोर्डिंगमध्ये, तसेच याळगी यांच्या घरी व्हायची. डॉ. के. वा. साठेंच्या घरीही बालगंधर्वांचा मुक्काम असे. खडेबाजारमधील शिवानंद थिएटर, शहापूरचे अंबिका थिएटर, आजच्या साई मंदिराजवळील मोकळी जागा व उभ्या मारुतीसमोरील मैदान अशा चार ठिकाणी बालगंधर्वांचे नाट्य प्रयोग होत असत. जुनी मंडळी आजही या चार ठिकाणांचा संदर्भसांगतात.