13 मंत्र्यांना पराभवाचा धक्का

13 मंत्र्यांना पराभवाचा धक्का
Published on
Updated on

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेते विजयी झाले; तर अनेक दिग्गज आणि तब्बल 13 मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला. त्यात राज्यातील प्रमुख नेत्यांसह उमेदवारी न मिळाल्यामुळे अन्य पक्षांत प्रवेश करून निवडणूक लढविलेल्या नेत्यांचाही समावेश आहे. राज्यात हायव्होल्टेज लढत ठरलेल्या कनकपुरा मतदारसंघातून काँग्रेसचे डी. के. शिवकुमार हे एक लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी मंत्री आर. अशोक यांचा पराभव झाला. चन्नपट्टण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी विजयी झाले, भाजपचे सी. पी. योगेश्वर पराभूत झाले. वरुणा मतदारसंघातून विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या विजयी झाले असून, तेथे भाजपचे मंत्री व्ही. सोमण्णा यांचा पराभव झाला.

भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी करून काँग्रेसकडून रिंगणात उतरून माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी हे भाजपचे महेश कुमठळ्ळी यांच्याविरोधात विजयी झाले. गोकाकमधून रमेश जारकीहोळी यांचा विजय झाला. शिकारीपूर मतदारसंघातून बी. एस. येडियुरप्पांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र, तर गदग मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मंत्री एच. के. पाटील विजयी झाले. चित्तापूरमधून प्रियांक खर्गे, तर कलघटगीमधून संतोष लाड विजयी झाले. काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिनेश गुंडुराव गांधीनगर मतदारसंघातून विजयी झाले. मंत्री आर. अशोक यांनी कनकपूर व पद्मनाभनगर या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढविली. ते पद्मनाभनगरमधून विजयी झाले, तर कनकपूरमधून डी. के. शिवकुमार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला आहे.

दिग्गज पराभूत

राज्यातील सर्वात लक्षवेधी ठरलेल्या लढतीत माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना पराभव सहन करावा लागला आहे. तिकीट न मिळाल्याने भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसवासी झालेले आणि आपल्या हुबळी-धारवाड मध्य या पारंपरिक मतदारसंघातून लढणारे शेट्टर त्यांचेच शिष्य भाजपचे महेश टेंगीनकाई यांच्याकडून पराभूत झाले. याच मतदारसंघातून ते पाचवेळा निवडून आले होते, हे विशेष.
आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनाही चिक्कबळ्ळापूर मतदारसंघातून पराभूत व्हावे लागले. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींचे पुत्र निखिल यांना रामनगरमधून पराभूत व्हावे लागले. निखिल यांच्यासाठी कुमारस्वामींनी हा मतदारसंघ सोडून चन्नपट्टणमधून निवडणूक लढवली. ते विजयी झाले. मात्र, आपल्या बालेकिल्ल्यात ते मुलाला विजयी करू शकले नाहीत. भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव सी. टी. रवी यांना चिक्कमंगळूर मतदारसंघातून पराभूत व्हावे लागले आहे. मुधोळचे भाजप उमेदवार बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांचाही पराभव झाला. स्वच्छ नेता अशी प्रतिमा असलेले विधानसभा सभापती विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनाही आपली जागा राखता आली नाही. ते शिरसीतून पराभूत झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news